अडचण
अडचणी येतात, ओरखडे ओढतात... त्याबद्दल माझं मत फारसं परखड नाही, पण, अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही... नदीच्या लोंढ्याउलट तग धरता आलं, आणि डोळे वटारून अरे ला कारे करता आलं, की लक्ष्यात येतं, परीक्षेचा हा पेपर तसा बोजड नाही, अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही... हो ना! आता पर्यंत तुझ्या एवढं आभाळ कुणावर कोसळलं नसेल! तुझं तेवढं कठीण आणि त्यांचं सोपंही असेल! पण तुला वाटतं तितकाही ओझं तुझं जड नाही.. अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही... आई, बाबा, भाऊ, बहीण, सखी किवा सखा... तू फक्त उभं राहायचं ठरव, तयार होईल पाठीराखा! प्रश्नाची उकल आपोआप उमलून दे... तुला समजून घेणार्याला तू ही समजून घे! पाठीराख्याची पकड अशी घट्ट करून घे, अडचणीची मानगूट धर आणि दूर भिरकावून दे! लागलंच तर बडबड कर, तुही थोडी धडपड कर, मग एकच टोला लगाव आणि चांगली अटकेपार कर! म्हणजे तीच अडचण येण्याची पुन्हा भानगड नाही... अडचणींना सामोरं जाणं तसं अवघड नाही!