पोस्ट्स

monsoon लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कलियुग

गावचे आंबे संपत आले… उकाड्यानी जीव हैराण झाला… उन्हाळ्याच्या सुटीचं शेपूट उरलं… समोरचा हिरवा डोंगरही ओसाड विराण झाला… पावसानी तेवढं 'वेळेवर येण्याचं' मनावर घेतलंय म्हणून, नाहीतर जगात बाकी सगळं कलियुग आहे मित्रा!

हितगूज

खांद्याची कमान कर नखशिखांत भीज... मग गोधडीची उब घेऊन दुमडून जरा नीज.. आठवणींच्या ओलाव्यात बीजासारखी रूज... कोवळ्या पालवीनी कर पावसाशी हितगूज...!

खात्री

आलास आलास म्हणतोस.. पण भेट तुझी अजून घडली नव्हती… तुझ्या येण्याची बातमी ऐकली तरी खात्री अजून पटली नव्हती... खातरजमा करायला दुसर्या माध्यमाची नाही गरज… खिडकीतून डोकावले की फक्त मुसळधार अंगावर बरस!

दोघी

एकीला ध्यास सुरांचा एकाला भावतो वारा... दोघांची ओढ मला सारखी... ती ही आहे जवळची.. तो ही आहे प्यारा.. दोघांचा स्वभाव सारखा, तरीही आहे न्यारा... पावसाच्या सरी आणि तानपुऱ्याच्या तारा...

वीज म्हणाली पावसाला....

जरा थांब जरा थांब तुझी झेप लांब लांब पागोळ्यांनी ओले खांब तुझी वाट तरी सांग... आळविते मी मल्हार तुझी जीत माझी हार अरे झेपे कसा भार अंग शहार शहार एक वेडा जणू नाद मोरपंखी घाली साद तूच पुढे कर हात मिळे तुला माझी दाद तुझा मेघ-निळा रंग कधी नागमोडी ढंग अरे तल्लीन होऊन पाहायचा लागे छंद माझा जीव तू आधा! वेडी झाले रे नाथा.. तू कृष्ण मी राधा! तू  कृष्ण मी राधा!

मनधरणी

पावसा पावसा लवकर ये, आकाशाला झाकोळून टाक... रस्त्यावरती धाव घे, हाकेला आमच्या पाव रे! लाहीलाही अंगाची... उन्हाच्या लाल रंगाची... उकाडा पार परतून दे हाकेला आमच्या पाव रे! दर्यातून ये खोऱ्यातून ये हिरव्यागार फांद्यातून ये हलक्याश्या झऱ्यातून ये नाचेल सारं गाव रे हाकेला आमच्या पाव रे! लहानांना आनंद दे शेतकऱ्याला धंदा दे लहान असो व थोर असो चिंब भिजायची हाव रे हाकेला आमच्या पाव रे! मे महिन्याचा भस्मासुर, कोरडं निर्जन दूरदूर... काळ्या ढगांचा लपंडाव, मनाला लावी हूरहूर... वाऱ्याच्या झोतातून ये! हाकेला आमच्या पाव रे! तुझी ओढ नेहमीचीच... आळवणी माझी तीच तीच... दरवर्षीची मनधरणी मागे लागते तरीही मीच... इस बार तो जल्दी आव रे हाकेला आमच्या पाव रे!

वचन

सर म्हणाली धरतीला, तुझ्या पर्यंत येई तोवर मी अगदी थकून जाते... इतकी तुझी ओढ, भेट होणार म्हणून मी अगदी हरखून जाते... पण उडी माझी कमी पडते... कंपन्यांच्या जंगलात मी कुठे हरवून जाते... पण विश्वास आहे माझा त्या वरच्या ढगावर, ढगातल्या देवावर! वीज येते कधी आणि मला हळूच खुणावून जाते, तुझ्या पर्यंत पोहोचायचा रस्ता प्रकाशात न्हाऊन देते! म्हणूनच, गावातून तुझ्या रोज गाश्या गुंडाळताना, परत येण्याचा वचन मी तुला देऊन जाते...

सर

किती भरून भरून येत आभाळ ढगाळ, मनी सोनियाच्या कमानीत हास्याची सकाळ, काही लिहावं म्हणून हाती लेखणी मी घ्यावी, कागदाला शाई लागे ... सर कोसळ कोसळ...

पाउस

पाउस पाउस... कशी अंधारी आणतो... मन मनाच्या आकाशी...शुभ्र चांदणं ओढतो... तुझ्या नसण्याने डोळे माझे पाणावले इथे... तिथे झुरशी तसा तू इथे पाउस पडतो...

|| आणायाच्या गोष्टी ||

येतोच आहेस इथे तर माझं काम थोडं कर… यादी आहे छोटीशी, या गोष्टी तेवढ्या बरोबर आण... नाक्यावरच्या गरम वडापावची जिभेवर तरंगणारी चव आण... तिथेच बाजूला चिंचेच्या झाडाची भर दुपारची सावली आण रस्त्यातून जाताना दिसणारे हसरे ओळखीचे चेहरे आण... बाजूच्या आजोबांनी दिलेली ती लीमलेटची गोळी आण... खेळणाऱ्या मुलांचा बाँल हरवून परत मिळाल्याचा आनंद आण क्रिकेटची मँच बघतानाचा जल्लोषही बांधून आण… भावाची पाठीवरची थाप आण… मैत्रिणीचं अखंड खिदळणं आण... आईची प्रेमळ हाक आण... बाबांचा आशीर्वाद आण… आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे... मातीचा सुवास आण… असु दे खाली आलेली ओली झाडाची फांदी… रस्ता आण धुतलेला… आणि आण तुझे मोकळे क्षण ... या वर्षी पावसाळ्यात तिथे नाही मी... तू येतोच आहेस तर माझं थोडं काम कर... या गोष्टी तेवढ्या तुझ्या गाठी बांधून आण...

अरे पावसा पावसा...

कसा कसा हा उन्हाळा लाही लाही अंगा अंगी... इथे उसासे मी सोडी तिथे झाली तुझी नांदी अरे पावसा पावसा असा निष्ठुर कसा तू? महाराष्ट्री तू आलासी इथे येई केव्हा सांगी... तुझ्या आगमनी माझे बेत आभाळाएवढे… तुझा स्पर्श मन मोही तो सुगंधही आवडे कशी राहू रे मी सांग मृतगंधाविना इथे... रुक्ष झाडं सरती माती हिरवाईचे वावडे... आठवते सर तुझी अन सोसाट्याचा वारा… सारीकडे पळापळ गार थेंबांचा तो मारा... एका आडोश्याला उभी वाट पाहे थांबायाची सर कोसळोनी येते, आणि तोल जातो सारा! चिंब भिजून मनात झाला अवघाची आनंद सारे डोलाया लागले मन हो माझे स्वछंद… डोळीयात माझ्या पाणी पण बाहेर ओसाड आठवते आज सारे… वारा वाही दूर मंद… माझी माणसे प्रदेश सारे दूर ते राहिले... पण तुझ्याच भरोशी इथे सारे मी साहिले... येई येई वेगी आता तुझे करते आर्जव… तुझ्या भेटीत तिकडच्यांचे हसू मी पाहिले…हसू मी पाहिले...