|| आणायाच्या गोष्टी ||
येतोच आहेस इथे तर माझं काम थोडं कर… यादी आहे छोटीशी, या गोष्टी तेवढ्या बरोबर आण... नाक्यावरच्या गरम वडापावची जिभेवर तरंगणारी चव आण... तिथेच बाजूला चिंचेच्या झाडाची भर दुपारची सावली आण रस्त्यातून जाताना दिसणारे हसरे ओळखीचे चेहरे आण... बाजूच्या आजोबांनी दिलेली ती लीमलेटची गोळी आण... खेळणाऱ्या मुलांचा बाँल हरवून परत मिळाल्याचा आनंद आण क्रिकेटची मँच बघतानाचा जल्लोषही बांधून आण… भावाची पाठीवरची थाप आण… मैत्रिणीचं अखंड खिदळणं आण... आईची प्रेमळ हाक आण... बाबांचा आशीर्वाद आण… आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे... मातीचा सुवास आण… असु दे खाली आलेली ओली झाडाची फांदी… रस्ता आण धुतलेला… आणि आण तुझे मोकळे क्षण ... या वर्षी पावसाळ्यात तिथे नाही मी... तू येतोच आहेस तर माझं थोडं काम कर... या गोष्टी तेवढ्या तुझ्या गाठी बांधून आण...