| गोडगाळणी |

चांगली माणसं, मोहक क्षण,
आवडती जागा, स्वच्छ मन,
सगळं सगळं गाळून फक्त हाच गाळ ठेवणारी
'गोडगाळणी' देईल का कुणी आणून?

शाळेच्या बेंच वर उभं राहून कान धरले तेव्हा
बाजूच्या बेंचवर उभी राहणारी ती,
कॉलेजच्या कट्ट्यावर रडत बसले तेव्हा
'मलाही इंग्लिश येत नाही' असं म्हणणारी ती...
यांना पुन्हा एकदा बिलगायचं म्हणून,
'गोडगाळणी' देईल का कुणी आणून?

वाढदिवसाच्या दिवशी ओवाळणारी आजी,
नोकरीचं पाहिलं प्रोमोशन मिळालं तेव्हा चॉकलेट देणाऱ्या काकू,
त्याच क्षणी परत जाऊन त्यांना मिठी माराय्च्ये म्हणून,
गोडगाळणी' देईल का कुणी आणून?

वरळी सी-फेस वर गुलाब घ्यायला लाजला होतास तेव्हाचा
उशीर झाला म्हणून स्वतः पोळ्या केल्या होतास तेव्हाचा
तो क्षण मुठीत घट्ट धरून तेवायचं म्हणून
'गोडगाळणी' देईल का कुणी आणून?

पहिल्यांदा ‘त्या’च्या घरात पाऊल ठेवलं तेव्हा
पहिल्या विमान प्रवासात ढगांचं राज्य पाहिलं तेव्हा
चेहर्यावरचं ते हसू पुन्हा अनुभवायचं म्हणून
'गोडगाळणी' देईल का कुणी आणून?

क्षण असे अनेक आहेत… आणि माणसांचीही यादी अमर्याद...
पण एखादा दिवस असा असतो...जेव्हा आठवणींचं बटण होऊन जातं बाद...

अशा वेळी सगळ्या आठवणीना गाळण्याची सोय हवी!
दुःख, त्रास, क्लेश वगळण्याची सोय हवी!
अशा वेळी ‘मन’ जर चिंताग्रस्त असेल…
काळजीनी, जबाबदार्यांनी पार त्रस्त असेल...
तेव्हा आपल्याच आयुष्यातल्या गोडव्यानी पुन्हा खुलून जावं म्हणून...
'गोडगाळणी' देईल का कुणी आणून?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...