संक्रांतीचा पतंग
कणी बांधा रे बांधा रे कणी बांधा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! माध्यान्हीचा सूर्य जर खाली सरू दे, गुळपोळीचा स्वाद जिभेवर असू दे, मांजाच्या रीळाला भरधाव सोडा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! लख्ख लख्ख सारं नीळं आभाळ असू दे, सूर्यास्ताला अजूनही तास असू दे, वार्र्याची मर्जी वेगाने जोखा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! एकीकडे खिडकीमध्ये 'चिंगी' असू दे, नजरेच्या कोपर्यातून 'बंड्या' बघू दे, बघता-बघता पतंगाने उसळी मारू दे! उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! समोरच्या गच्चीबरोबर काटाकुटी चालू दे, वार्र्याच्या तालावर पतंग डोलू दे, कधी जबर खेचाखेच तर कधी थोडी ढील दे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! कधी गट्टी कधी कट्टी चाले पतंगाचा खेळ, भिन्न-भिन्न रंगाचा आकाशात मेळ, घराच्या दोन भिंतींतून बाहेर पडा रे, उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे! पतंगाची उंची भारी, रेखाटली दिशा सारी, नजर वर वर करा, उत्साहाने डोळे भरा! क्षणासाठी सार्र्या चिंता विसर जरा रे! उंच उडवा रे पतंग उंच उडवा रे!!