तेरावा तास

काहीतरी नवं करायचंय,
नेहमीच्या बारा ताशी घड्याळात
                       तेरावा तास शोधायचाय

हा तास नाविन्याचा असेल,
 कल्पकतेचा असेल, आस्वादाचा असेल,
सानिध्याचा असेल.

तासाला मिनिटं साठ, पण क्षण अनेक,
प्रत्येक क्षण आशेनी भरलेला कधी
उत्साहाचे भरते आणणारा, कधी
चुरशीची जुगलबंदी ऐकवणारा, कधी
 शांत, निरव पाण्यासारखा, कधी
खळखळणाऱ्या झऱ्यासारखा…

या तासात मोठा आणि छोटा काटा
                   सारख्याच आकाराचा…
रंगीबेरंगी गोष्टीनी नटलेल्या
                   भिंतीवरच्या चित्रासारखा तास!

एकच तास पुरे, अधिक नको,
पण जो मिळेल तो हक्काचा हवा,
ज्या तासातून बाकीच्या बारा
तासांना उर्जा मिळेल असा.

शोधला तर सापडेल हा तास,
कधी पहाटेच्या थंडीत, कधी
रात्रीच्या झोपाळलेल्या काळोखात,
कधी दुपारच्या पेंगणाऱ्या वार्यात…

शोधायला हवा हा तेरावा तास!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2