आशा

"कॉलर कर नीट
हो जरा धीट
हळूच डोळे मीट
लावते छान तीट"

"तुझा ड्रेस धुवायला हवा
उद्या १५ ऑगस्ट आला
वाण्याकडून साबण तूच आण
आज वेळ नाही मला…"

"आई, एक गोष्ट होती…
बाईंनी सांगितलेली…
'फी' आणलीस तरंच शाळेत ये"
- ती उभी गारठलेली…

"बाळा, मालकाला विचारलंय,
उद्या नक्की देते…
पावसात उभी नको राहू,
उगा सर्दी होते…"

पळाली ती चिमुरडी
शाळेच्या दिशेने
तसा, आईने लावला आवाज,
नव्या उमेदीने!

"पाव किलो मटार, २२ रुपयाने!
पाव किलो मटार, २० रुपयाने!!"

दादरचा फुटपाथ,
सकाळचा प्रहर…
स्वतंत्र भारतात,
आशेला बहर!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2