उन्हाळ्याची सुटी

हात नको सोडू आजी जाऊ आपण भूर
उन्हाळ्याची सुटी सुरु शाळा अजून दूर

बागेत जाऊ फिरायला दादालाही घेऊ
दमून मग झोपू तुझ्या कुशीत मऊ मऊ












रव्याचे लाडू आणि उन्हातल्या चिकवड्या
आमचा 'कडक' पहारा आणि वाळवणाच्या साड्या

लिंबाच्या सरबताची सरबत्ती लागू दे
पत्त्यांच्या डावासाठी सगळी चाळ जागू दे

रात्री गेले लाईट कि पेटीचा लागे सूर
मोठ्यांची मैफिल आणि छोट्यांची टूरटूर

संध्याकाळची धुपारती निरंजनांची आरास
बागुलबुवाची गोष्ट आणि रात्रीचे भास

मावळत्या सूर्यासह  'शुभं करोति' च्या ओळी
पाय तुझे चेपल्यावर मिळणारी चिंचेची गोळी ...

तुझा पदर धरून आजी जीवाची केली मुंबई ,

मिळेल का हा स्वानंद , जमवली किती पै पै?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2