पाळीच्या देवाला साकडं...

पाळीच्या देवा तुला कोपरापासून नमस्कार
जीवच घेशील माझा आता इतके तुझे सोपस्कार

स्त्रियांच्या वाट्याला तेवढा आणलास हा त्रास
पुरूषांची पंचाईत विषय तसा खास

महिन्यातून एकदा तू पाहतोस माझा अंत
कडकलक्ष्मीचं रूप तुझं मी मात्र संत

उपास घडतो, कान धरते, पायघड्याही घालते,
होतातच शेकडो प्रदक्षिणा, हवंतर अभिषेकही करते...

पण महिन्याच्या या त्रासातून एकदाची सुटका कर
तुझा कोप परवडला पण हिशोब काय तो चुकता कर!

हसू रडू हसू रडू मनाचे होतात खेळ
मेंदूचा आणि हृदयाचा जुळेचना मेळ...

वजनाच्या काट्याचं सुरु असतं अष्टांगीं नृत्य,
आईसक्रीम चे डबे क्षणात होतात फस्त...

Photo credit- Rajashri Productions












श्रावणातल्या सणांची शपथ, अस्पृश्यतेचा आलाय वीट
पाळी चांगली की वाईट? देवा ठरव एकदा नीट

तू असं का करत नाहीस?

कायमची सुटी दे, पाळीला मार फुली
तूही मोकळा कामातून आणि सुटल्या सगळ्या मुली!

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
II सखी II
***************
ती आली आयुष्यात अन् मी मोठी झाले
अवखळ मुलीची एकदम बाई झाले
नको वाटायचे तिचे येणे
सगळ्यात असून दूर बसणे
सण नाही वार नाही
तिचे येणे ठरलेले
अन् तिच्या येण्याने माझे बेत उधळलेले
बरोबर महिन्याने यायची
येण्याआधी आठ दिवस चाहुल द्यायची
इतकी सवय झाली तिची
की नाही आली वेळेवर तर मी चिडायची
सगळे तिचे नखरे सहन केले
तिने नाचवले तशी नाचले
तिनेच एकदा न येऊन सांगितले गुपित
आई होशील आता गर्भ रुजलाय कुशीत
तेवढाच काय तो दुरावा बारा महिन्यांचा
पण नंतर आलीच परत भाग होऊन आयुष्याचा
इतकी वर्षे चाललेय तिच्या सोबत
कधी कंटाळा दाखवला नाही
आता मात्र काय झालेय तिचे
मनातलं काही सांगत नाही
नसलं मनात तर येत नाही दोन दोन महिने
मी मात्र सैरभैर तिच्या न येण्याने
कशासाठी ही चिडचिड कोणालाच कळत नाही
कशासाठी ही कासावीशी माझे मला वळत नाही
कधीमधी येत राहून ती मला चिडवणार
तिच्याच मनासारखे वागून ती मला ताटकळवणार
ती यायला लागली तेव्हा सोहळा केला होता आईने
तिच्या जाण्याची हुरहुर मात्र सोसतेय मी एकटीने
एक वेळ अशी येईल तिचे येणे बंद होईल
एक कप्पा आयुष्यातला कायमचा दूर होईल
होईन मी मुक्त बांधिलकीतून म्हणून वाजवावीशी वाटतेय टाळी
तुमचीही परिस्थिती नाही माझ्यापेक्षा वेगळी
वाचताना गालात हसाल
ही तर माझीच कहाणी म्हणाल
येते मनाने जाते मनाने ही
बंधन कसले पाठवत नाही
अशी ही एकमेव मैत्रीण खाशी
जरी असल्या आपल्या बारा राशी

‬'पाळी' वर इतकी सुंदर कविता पण होऊ शकते?
Unknown म्हणाले…
Thank you Neha Kaku. Wachli Hoti me hi Kavita what's app Ali hoti na? Masta ahe hi pan.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2