पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सवयीची जागा

सवयीचा झाला आहे आता । विमानाचा चमचमता आकाशातला दिवा क्षितीजाच्या पलिकडचा जांभळा काळोख हवा हवा फक्त स्वतःचं ऐकणारा, न बोलणारा तास कैक मैल जाऊनही स्थैर्याचा भास सवयीचा झाला आहे आता । गोड बोलणारी आत्मविश्वासु हवाई सुंदरी पडद्या पलीकडची धून कुठलीशी अधमुरी नेहमीच्या सवयीने आरामात चढणारे पाच जण नजरेत न सामावणारं विमानतळाचं मोकळेपण सवयीचं झालं आहे आता । एकाच साच्यातले शोभेचे 'तिरामिसु' ग्राउंड स्टाफचं ओळखीचं हसु हक्कानं मिळवलेलं 'aisle' सीटचं अढळपद रंगीत पेयांची आणि खाद्याची रसद सवयीची झाली आहे आता । नेहमीची बॅग, नेणाऱ्या सामानाची मनातली यादी चार्जर, चाव्या, पाकीट, कपडे आणि निरुपयोगी मानेची गादी छोटासा 'मुका', गालांवर खास, जाण्याची हुरहूर, येण्याची आस, सवयीची झाली आहे आता । घरातलं घरपण... ऑफिसचं थोरलेपण... यांच्यातला दुवा म्हणजे आकाशातला प्रवास ! प्रवासात मिळालेली ध्रुवताऱ्याची जागा सवयीची झाली आहे आता ।

बेरीज-वजाबाकी

शोधून तुझा चेहरा मी आरशात पाहिला... पण माझाही चेहरा मला सापडला नाही ... दिवस होते मंतरलेले ऊब होती हवेत बाहेर कोसळता पाऊस आणि मी तुझ्या कवेत ... आल्याचा चहा तुझ्या हातचा खास होता, प्रेमाच्या बेरजेवर साथीचा 'हातचा' बास होता ... वेडे होतो आपण, एकमेकांत साखळी सारखे अडकलेले, डोळ्यातले भाव वर वर चढत गेलेले... कुठे गेला मधला काळ? कसे काढले आपण दिवस? खुश होतो बहुतेक, फेडलेही काही नवस! शोधून पाहिला चेहरा मी आरशात आज तुझा आरशानी मात्र दाखवला चेहरा माझा ... बदलेली मी , सुंदर प्रतिबिंब ... पण मग डोळ्यातले ते भाव का होते वजा? - केतकी