सवयीची जागा

सवयीचा झाला आहे आता ।

विमानाचा चमचमता आकाशातला दिवा
क्षितीजाच्या पलिकडचा जांभळा काळोख हवा हवा
फक्त स्वतःचं ऐकणारा, न बोलणारा तास
कैक मैल जाऊनही स्थैर्याचा भास

सवयीचा झाला आहे आता ।

गोड बोलणारी आत्मविश्वासु हवाई सुंदरी
पडद्या पलीकडची धून कुठलीशी अधमुरी
नेहमीच्या सवयीने आरामात चढणारे पाच जण
नजरेत न सामावणारं विमानतळाचं मोकळेपण

सवयीचं झालं आहे आता ।

एकाच साच्यातले शोभेचे 'तिरामिसु'
ग्राउंड स्टाफचं ओळखीचं हसु
हक्कानं मिळवलेलं 'aisle' सीटचं अढळपद
रंगीत पेयांची आणि खाद्याची रसद

सवयीची झाली आहे आता ।

नेहमीची बॅग, नेणाऱ्या सामानाची मनातली यादी
चार्जर, चाव्या, पाकीट, कपडे आणि निरुपयोगी मानेची गादी
छोटासा 'मुका', गालांवर खास,
जाण्याची हुरहूर, येण्याची आस,

सवयीची झाली आहे आता ।

घरातलं घरपण... ऑफिसचं थोरलेपण...
यांच्यातला दुवा
म्हणजे आकाशातला प्रवास !

प्रवासात मिळालेली
ध्रुवताऱ्याची जागा

सवयीची झाली आहे आता ।

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...