श्रीगणेशा

लिहायला घेतलं तरी काही सुचत नाही हल्ली...
लेखणीची धारच जणू कमी झाली आहे

रस्त्यावरून जाताना गोष्टी दिसतात, माणसं भेटतात,
काही मनाला स्पर्शून जातात...
पण चेतना बोथट करण्याची हल्ली सवय झाली आहे...
लेखणीची धारच जणू कमी झाली आहे...

डोक्याला ताप नको, हाताला काम नको,
पायाला वेग नको, गाडीला गर्दी नको...
इच्छांची लिस्ट हल्ली वाढत चालली आहे,
लेखणीची धारच जणू कमी झाली आहे...

पूर्वी कारणाशिवायही कविता मनात तयार व्हायची...
लेखणी सापडली की कविता कागदावर उतरायची!
हल्ली कारणं मिळूनही शाई उरलीच आहे...
लेखणीची धारच जणू कमी झाली आहे...

पाऊस आला... बरसला... बरसून परत येईनासा झाला...
कविता स्फुरण्याचा मोसम संगे घेऊन चालला...
काहीच दुःखं नाहीत, जिंदगी सुखी झाली आहे,
तरीही...
पाठकोरड्या पानांची वही कोरीच राहिली आहे...
लेखणीची धारच जणू कमी झाली आहे...

मनाला आधार देणारे "ते" आता कडेला आहेत,
मनाची मरगळ दूर करणारी "ती" आता हाकेच्या अंतरावर आहे,
मनाला उमेद देणारा "तो" आता साथीला आहे,
खरंच, धारेची गरज लेखणीला नाही, मनाला आहे!

उठ मना, धावत जा...
उंच उंच आभाळात...!
उठ मना, पोहत जा...
खोल खोल समुद्रात...!

खेचून आण दोन तारा,
वेचून घे चार मोती...
साठवून ठेव गाठीला,
जमवलेली नातीगोती!

लेखणी तर आहेच इथे,
पानांची जुळवाजुळव कर,
हाताच्या ओंजळीत
आठवणींची टाक भर...

लिहिता लिहिता लेखणीला थोडी धार आली आहे...
पुन्हा श्रीगणेशा करायची आता वेळ झाली आहे....
आता वेळ झाली आहे...

टिप्पण्या

Kshitija म्हणाले…
khup sundar ahe ga..khup chan :)
हर्षद बर्वे म्हणाले…
वा...! मस्त आहे...चालुदे जोरात..लेखणी...!
Abhi म्हणाले…
Hi Ketki,
"Shri Ganesha" cha shri ganesha kela and "EETI" paryant gelo.
Khupach Sundar Ahe.
GR8.

Keep Writing.
Best Wishes
Abhijeet

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...