पोस्ट्स

मार्च, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओढ

हिरव्या डोंगरांची पांढर्या धबधब्यांची... आंब्याच्या सावलीची काजुच्या बियांची! ओढ.... लाल गढूळ पाण्याची गुर्हाळ्यातल्या रसाची गोठ्यातल्या गाईची खळखळत्या हश्याची! ओढ... बागेतल्या शहाळ्याची सोलांच्या कढीची नाश्त्यात मऊभाताची आंब्याच्या अढीची ओढ... 'ऐसपैस डब्या'ची जोरदार भांडणांची क्षणात झालेल्या युतीची हिरकुटाच्या बाणाची ओढ... 'रामरक्षे'च्या प्रसादाची देव्हार्यातल्या दिव्याची उंच उंच झोक्याची दूर जाण्याऱ्या थव्याची ओढ... पत्ते अन् नव्या व्यापाराची मऊशार गोधडीची माडीवरच्या चिंचांची लपवलेल्या पोतडीची! ओढ... कोल्हा-करकोच्याच्या गोष्टीची विहिरीच्या रहाटाची तुळशीच्या अंगणाची पाहुण्यांच्या चर्हाटाची ओढ... सोडता सोडवत नाही... तोडता तोडवत नाही... मोडता मोडवत नाही... आजोळची... ओढ!

वेस

इमेज
उगवत्या सूर्याला मी लालबुंद होताना पाहिलंय... उजाडताना पाहिलंय, प्रकाशताना पाहिलंय! पण गावच्या वेशीवर आज मन अस्वस्थ होऊन राहिलंय... लुकलुकत्या डोळ्यांनी माझं घर उध्वस्त होताना पाहिलंय... A Tribute To All Those Who Suffered in Japan Tsunami & Earthuake ... 11 March 11.

सुखाचं गाठोडं

बसच्या खिडकीतून बाहेर पाहत झोप कधी लागते हे कळतच नाही... दमलीस का? विचारलस तर ते ही खरं नाही... सुखाचा सदरा शोधता शोधता गाठोडं हाती लागलंय, स्वप्न की वास्तव हे कळू नये, इतकं सुख ही बरं नाही!

खारीचा वाटा

"घनदाट झाडी कशी असते ग आई?" "खरं सांगू..मी ही कधी पाहिलेलीच नाही... " इथे आले राहायला तेव्हा एक दिवसाची होते, डोळे उघडले नव्हते तरी ते किती काळजी घेत होते! रोज येऊन मला त्यांनीच पाणी पाजलं, स्वत:च्या मुलासारखं त्यांनीच मला जपलं... मोठी झाले मी तरी इथेच कायम राहिले, आजूबाजूला घडणारे सगळे बदल पाहिले... म्हणतात बाहेरच्या जगात, 'आपल्या'सारखे असंख्य आहेत... सार्या संकटांना तोंड देऊन अजूनही अजिंक्य आहेत! ते सारे बाहेर राहून करत आहेत जे काम, तेच इथे करायचय आपण न करता आराम... "पण आई, आपल्याकडे कुणी पहातही नाही?! म्हातारबुवा सोडला, तर कुणी पाणीही पाजत नाही.. मग का आपण या सगळ्यांना करत राहायची मदत? जन्मभर अथक प्रयत्न करत राहायचं झिजत?!" कारण बाळा, मदत करणं हा आपला धर्म आहे... कर्म करत राहायचं हेच खरं मर्म आहे। दोन गोष्टी मोलाच्या सांगते बाळा नीट ऐक, हीच तत्वं पाळत आल्या आपल्या पिढ्या कैक! बाहेर वा आत अस. पण दोन्ही हातानी देत जा. खारीच्या वाट्याची जादू उघड्या डोळ्यांनी पाहत राहा! हसत मुखाने अभिवादन नेहमी कर सगळ्यांना, असं काम...

Promotion

promotion हे पावसाच्या ढगांसारखं असतं… काळ्या रंगानी आमिष दाखवतं… जवळ येत जाईल तसतसं मोहक वाटत जातं... पण हवामान खात्यानी पडेल म्हटलं तर न पडणारं… Manager नी मिळेल म्हटलं तर न मिळणारं… आणि अपेक्षित नसताना चिंब भिजवून टाकणारं… अचानक एखाद्या क्षणी गोड बातमी देणारं... promotion… emotions चं commotion!

कोडॅक मोमेंट!

लग्नाचा हॉल, माणसांची संख्या, फुलं, माळा आणि अक्षता अक्ख्या! मँचिंगचे ब्लाउस, साडीला बिडिंग... पत्रिकेचा मजकूर.. हँपी वेडिंग! आमंत्रणं, सजावट, इमेल की फोन? देण्याघेण्याच्या पिशव्या आणि मेंदीचे कोन! आलं, मिरच्या कोथिंबीर फ्लॉवर... दुध दही लोणी आणि साखर ! मामा, मामी, मामीचा भाऊ, भावाचे मित्र, मित्राची जाऊ! घराला रंग, सोफ्याला कव्हर, बिल्डींगच्या गेटलाही लग्नाचा फ्लेवर... केटरिंग डेकोरेशन double checking! हनिमून पॅकेज आणि advance booking! ग्रहमक, पिवळी साडी...बहिणीचा मान, अन्नपूर्णा देवी आणि उखाण्याचं पान... जाताना गाडीसाठी गुलाबाचा हार , VIP ची बॅग आणि सामानाचा भार मेकअप, हेअरस्टाईल checklist च्या घड्या, इस्त्रीचे कपडे मुंडावळ्यानच्या लड्या! पायधूणं, रांगोळी आरतीचं तबक... दाराला तोरण मनात धकधक... मुहूर्त... अंतरपाट... मंगलाष्टकं, कावेरी नर्मदा..सावधान ... लोकं! जेवणं, reception ... एखादी छबुक कॉमेंट! पाठवणी आणि हूरहूर... कोडॅक मोमेंट!