पोस्ट्स

सवयीची जागा

सवयीचा झाला आहे आता । विमानाचा चमचमता आकाशातला दिवा क्षितीजाच्या पलिकडचा जांभळा काळोख हवा हवा फक्त स्वतःचं ऐकणारा, न बोलणारा तास कैक मैल जाऊनही स्थैर्याचा भास सवयीचा झाला आहे आता । गोड बोलणारी आत्मविश्वासु हवाई सुंदरी पडद्या पलीकडची धून कुठलीशी अधमुरी नेहमीच्या सवयीने आरामात चढणारे पाच जण नजरेत न सामावणारं विमानतळाचं मोकळेपण सवयीचं झालं आहे आता । एकाच साच्यातले शोभेचे 'तिरामिसु' ग्राउंड स्टाफचं ओळखीचं हसु हक्कानं मिळवलेलं 'aisle' सीटचं अढळपद रंगीत पेयांची आणि खाद्याची रसद सवयीची झाली आहे आता । नेहमीची बॅग, नेणाऱ्या सामानाची मनातली यादी चार्जर, चाव्या, पाकीट, कपडे आणि निरुपयोगी मानेची गादी छोटासा 'मुका', गालांवर खास, जाण्याची हुरहूर, येण्याची आस, सवयीची झाली आहे आता । घरातलं घरपण... ऑफिसचं थोरलेपण... यांच्यातला दुवा म्हणजे आकाशातला प्रवास ! प्रवासात मिळालेली ध्रुवताऱ्याची जागा सवयीची झाली आहे आता ।

बेरीज-वजाबाकी

शोधून तुझा चेहरा मी आरशात पाहिला... पण माझाही चेहरा मला सापडला नाही ... दिवस होते मंतरलेले ऊब होती हवेत बाहेर कोसळता पाऊस आणि मी तुझ्या कवेत ... आल्याचा चहा तुझ्या हातचा खास होता, प्रेमाच्या बेरजेवर साथीचा 'हातचा' बास होता ... वेडे होतो आपण, एकमेकांत साखळी सारखे अडकलेले, डोळ्यातले भाव वर वर चढत गेलेले... कुठे गेला मधला काळ? कसे काढले आपण दिवस? खुश होतो बहुतेक, फेडलेही काही नवस! शोधून पाहिला चेहरा मी आरशात आज तुझा आरशानी मात्र दाखवला चेहरा माझा ... बदलेली मी , सुंदर प्रतिबिंब ... पण मग डोळ्यातले ते भाव का होते वजा? - केतकी

शिवरायांचे वीर

इमेज
Two students at the base of Lohagad fort...

तू नकोस जाऊ दूर...

तू नकोस जाऊ दूर ओढुनी रेषा आपल्यात, मी माझ्या बाजू, खूप आठवणी हळूच जपल्यात... इतक्या सहजीने मोडलास तू खेळ आपला का? मी हरायलाही तयार तरीही डाव संपला का? तू सरळ ओळीचा नाकासमोर चाल चालणारा, मी नागमोडीच्या वळणांमध्ये ध्यास लावणारी... तू धीट कसा इतका करामती समजेना मजला... तळहातावरती जीव तरीही कळेचना तुजला... नशिबाच्या नशिबानेच आपली भेट भेदुनी गेली... सांगु तरी रे काय?... हृदयास छेदूनि गेली... तू तुझ्याच आयुष्यात मग्न हो आशीर्वाद तुला, पण नको करू रे दूर असे इतक्यातच बाद मला... 

मृदू स्वभावाचं गाव

इमेज
ओटावा की ऑटोवा? शब्द हळूच बोलावा ... बर्फाच्या शालीत लपलेलं गाव, त्याला प्रेमाची ऊब आणि मायेचा ओलावा || निळीशार तळी , हिरव्या गच्च बागा थेंबांनी नटलेल्या मोकळ्याश्या जागा मेपल च्या झाडांच्या लांबच लांब रांगा निसर्गाच्या मनात जणू आनंद साठावा ... ओटावा की ऑटोवा? त्याला प्रेमाची ऊब आणि मायेचा ओलावा | कधी सूर्याचं तेज, कधी पावसाची 'फेज' वाऱ्याचा झुळकीनं उडणारे केस... गॅलेरीत बसून खुशाल दिवस घालवावा ओटावा की ऑटोवा ?...मायेचा ओलावा| प्रत्येक जागेचा आपलासा एक स्वभाव असतो...  तिथल्या आयुष्याचा त्यात मुखडा दिसतो  बाकी छानछोकीचा डौल असेलही, पण या जागेचा मूळ स्वभाव, 'मृदू' असावा..  ओटावा की ऑटोवा ?...मायेचा ओलावा | घरच्यांपासून दूर, आई गेली भूर... तरी रोज व्हिडिओ मधून ऑटोवाची टूर! मथुरेचा कृष्ण जणू द्वारकेत खेळावा, ओटावा की ऑटोवा ? शब्द हळूच बोलावा ... 

पाळीच्या देवाला साकडं...

इमेज
पाळीच्या देवा तुला कोपरापासून नमस्कार जीवच घेशील माझा आता इतके तुझे सोपस्कार स्त्रियांच्या वाट्याला तेवढा आणलास हा त्रास पुरूषांची पंचाईत विषय तसा खास महिन्यातून एकदा तू पाहतोस माझा अंत कडकलक्ष्मीचं रूप तुझं मी मात्र संत उपास घडतो, कान धरते, पायघड्याही घालते, होतातच शेकडो प्रदक्षिणा, हवंतर अभिषेकही करते... पण महिन्याच्या या त्रासातून एकदाची सुटका कर तुझा कोप परवडला पण हिशोब काय तो चुकता कर! हसू रडू हसू रडू मनाचे होतात खेळ मेंदूचा आणि हृदयाचा जुळेचना मेळ... वजनाच्या काट्याचं सुरु असतं अष्टांगीं नृत्य, आईसक्रीम चे डबे क्षणात होतात फस्त... Photo credit- Rajashri Productions श्रावणातल्या सणांची शपथ, अस्पृश्यतेचा आलाय वीट पाळी चांगली की वाईट? देवा ठरव एकदा नीट तू असं का करत नाहीस? कायमची सुटी दे, पाळीला मार फुली तूही मोकळा कामातून आणि सुटल्या सगळ्या मुली!

गुरु

हे गुरु माझ्या गळ्याला साथ दे आकार दे उंच आकाशी उडाया पंख दे आधार दे | मार्ग जो सांगशील तू पाठीराखा होऊनी तन मनाने झोकुनी त्यावरी चालेन मी | गायनाच्या माध्यमाने जीवनाचे दे धडे शांततेच्या साधनेने स्वरांशी भक्ती जडे | शाश्वताच्या पलीकडे लिलया नेलेस तू खरे गाणे शोधण्याचे द्वार उघडलेस तू  | जादुई तुझ्या स्वराला अशीच दाद मिळो गुरूच्या सानिध्याचा फक्त आशीर्वाद मिळो |