उपास मज लागला...

उपास मज लागला गडयांनो उपास मज लागला!


विठूरायाची एकादशी, गणरायाची संकष्टी,
असला-तसाला नाही माझा उपास बहु कष्टी!
करूनच दाखवण्याचा निश्चय आज मनी साठला,
उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला!

एकच इच्छा आहे माझी 'आय-फोन' एक मिळावा,
कॉलेजच्या कट्ट्यावर माझा उदो-उदो व्हावा!
पालकांनीही दिली मंजुरी, एकच 'पण' घातला!
उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला!

पिताश्रींनी केली गर्जना, संगणकी नेले,
"फेसबुक एकादशी"त्याचे नामकरण केले!
संगणकाचा स्पर्शही वर्ज या दशदिनी उपवासाला,
उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला!

उपास माझा अलग असे सोपा तर अजिबात नसे!
जो जो म्हणतो "सहज करीन", तो तो या ते जरूर फासे,
विचार त्याचा करुनी केवळ कंठ आज दाटला
उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला!

डोके भिर-भिर फिरू लागले, हात सारखा पुढे सारे,
हळूच संधी घेऊन टाकू, एकाच इच्चा मनी उरे!
कधी नव्हे तो या इच्छांचा अंत आज गाठला
उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला!

दहावा दिवस आज असे... चार तासांची मुदत दिसे,
संगणकाशी आमने-सामने.. घरातही कोणीच नसे!
पडलो बळी मी अखेर अश्या मोहाच्या क्षणाला...
उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला!

वायूवेगे बोटे माझी भिर-भिर-भिर फिरली...
एकेका updates वर माझी नझर अशी खिळली...
तोच कोठुनी पिताश्रींना सुगावा याचा लागला?
उपास वाया गेला माझा उपास वाया गेला...

विजयी मुद्रेने पिताश्री माघारे वळले
चेहरा माझा पडला.. काय कळायचे ते कळले
अभ्यासाचे काढले पुस्तक, टाळे संगणकाला,
उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला!

दोन महिने उलटून गेले... परीक्षेचे वादळ संपले...
पुन्हा नव्याने "facebook एकादशी" चे ठाम केले...
काय सांगू? आज तो I -Phone पुन्हा स्वप्नात आला...
उपास मज लागला गड्यांनो उपास मज लागला!

टिप्पण्या