पोस्ट्स

2010 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वचन

सर म्हणाली धरतीला, तुझ्या पर्यंत येई तोवर मी अगदी थकून जाते... इतकी तुझी ओढ, भेट होणार म्हणून मी अगदी हरखून जाते... पण उडी माझी कमी पडते... कंपन्यांच्या जंगलात मी कुठे हरवून जाते... पण विश्वास आहे माझा त्या वरच्या ढगावर, ढगातल्या देवावर! वीज येते कधी आणि मला हळूच खुणावून जाते, तुझ्या पर्यंत पोहोचायचा रस्ता प्रकाशात न्हाऊन देते! म्हणूनच, गावातून तुझ्या रोज गाश्या गुंडाळताना, परत येण्याचा वचन मी तुला देऊन जाते...

श्रीगणेशा

लिहायला घेतलं तरी काही सुचत नाही हल्ली... लेखणीची धारच जणू कमी झाली आहे रस्त्यावरून जाताना गोष्टी दिसतात, माणसं भेटतात, काही मनाला स्पर्शून जातात... पण चेतना बोथट करण्याची हल्ली सवय झाली आहे... लेखणीची धारच जणू कमी झाली आहे... डोक्याला ताप नको, हाताला काम नको, पायाला वेग नको, गाडीला गर्दी नको... इच्छांची लिस्ट हल्ली वाढत चालली आहे, लेखणीची धारच जणू कमी झाली आहे... पूर्वी कारणाशिवायही कविता मनात तयार व्हायची... लेखणी सापडली की कविता कागदावर उतरायची! हल्ली कारणं मिळूनही शाई उरलीच आहे... लेखणीची धारच जणू कमी झाली आहे... पाऊस आला... बरसला... बरसून परत येईनासा झाला... कविता स्फुरण्याचा मोसम संगे घेऊन चालला... काहीच दुःखं नाहीत, जिंदगी सुखी झाली आहे, तरीही... पाठकोरड्या पानांची वही कोरीच राहिली आहे... लेखणीची धारच जणू कमी झाली आहे... मनाला आधार देणारे "ते" आता कडेला आहेत, मनाची मरगळ दूर करणारी "ती" आता हाकेच्या अंतरावर आहे, मनाला उमेद देणारा "तो" आता साथीला आहे, खरंच, धारेची गरज लेखणीला नाही, मनाला आहे! उठ मना, धावत जा... उंच उंच

सर

किती भरून भरून येत आभाळ ढगाळ, मनी सोनियाच्या कमानीत हास्याची सकाळ, काही लिहावं म्हणून हाती लेखणी मी घ्यावी, कागदाला शाई लागे ... सर कोसळ कोसळ...

काम नसलेला एक जण...

काम नसलेला एक जण एकदा मला भेटला... काम नाही म्हणून फिरतो असा मला म्हणाला… मी म्हटलं त्याला अरे मुंबई मध्ये आहेस… इथे आंधळा, पांगळा सगळ्यांना अन्नाचा दाणा गावला… तुही काही काम कर… थोडं चालव तुझं डोकं… नाहीतर हात चलाखी दाखव... जमा होतील की लोकं… अगतिक झाला तो... डोळ्यात पाणी आणून म्हणाला… एक काळ होता जेव्हा झोपायचीही सवड नव्हती… पण आता मात्र माझं खातंच 'त्यानं' बंद करून टाकलं… VRS चा फॉर्म भरून मला काढून टाकलं… सांगितलं त्यानं जे नंतर, सांगीन सावकाशीनं श्रोतेहो… पण ऐकून मला त्याची कहाणी वाटली त्याच्याशी आपुलकी… गोष्ट होती त्याची आणि होती त्याच्या boss ची… Boss म्हणजे 'देव' वरचा... खातं होतं माणुसकी!

परत एकदा...

आज परत एकदा काखोटीला चंबू गबाळ बांधायची वेळ आली आहे.. परत एकदा आप्तांना अलविदा म्हणायची वेळ आली आहे.. आहे नव्या प्रवासाची आस.. पण रस्ता जुना आहे... आज परत एकदा घरी जायची वेळ आली आहे...

धुकं

तिच्या हातांची उब अजून तळव्यावर टिकून आहे... तिच्या ओठांचं मिश्कील हास्य अजून डोळ्यात साठवून आहे... तिनं हात मागे जरी आज घेतला असेल गड्या, तिच्या सहवासाचं धुकं अजूनही मी राखून आहे...

आईस पत्र

आई तुझ्या संसाराला चाकं तरी किती ? दहा हात-पाय तुझे म्हणून का ही गति?! माझ्यावर ती पाळी आलीय कही खरं नाही... कधी मीठ अति होई कधी अळणी राही ! हिशोबाचा पाढा रोज वाढतच जातो, पण खर्च करणं भाग आहे नाईलाज होतो... ऑफिस मधे वेगळी तर्हा, अगडबंब काम! जुळवाजुळवी करता करता, माझं राम-नाम! हार मानणार नाही मी, भले न का थको? बाकी सगळं ठीक आहे... तू काळजी करू नको!