पर्जन्य प्रार्थना

ये रे पावसा पावसा
आता अंत नको पाहू
तुझ्या पायाशी लोटांगणेही
माथा ही टेकवू ।

येशी आकाशाच्या मार्गे
विधात्याचे रूप घेशी
कष्ट साचलेत फार
आता माझ्या मायदेशी |

लोक भुकेले तहाने
डोइ छप्परही नाही
त्यांच्या आसवांना लपायाला
समयही नाही |

मोठा गनीम बलाढ्य
आता मृत्यू हेच सत्य ....
असा कडाडून ये तू
भेद अदृश्य हे युद्ध |

अरे पावसा पावसा
तुझा माफीचा स्वभाव
माणसाची चूकभूल
पोटी घाल दया दाव |

थेंबाथेंबातून तुझ्या
तुझी माया बरसुदे
शून्यातून पुन्हा उभा
आज माणूस राहू दे |

धरतीची मी लेक
केतकी साकडं घालते
कधी येशील रे आता 
तुझी वाट मी पाहते |

अरे पावसा पावसा 
अवतरशील धर्तीवर 
तुझ्या कृपेवर आम्ही 
उभे जोडुनिया कर... जोडुनिया कर ...| 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2