खारीचा वाटा

"घनदाट झाडी कशी असते ग आई?"
"खरं सांगू..मी ही कधी पाहिलेलीच नाही... "

इथे आले राहायला तेव्हा एक दिवसाची होते,
डोळे उघडले नव्हते तरी ते किती काळजी घेत होते!

रोज येऊन मला त्यांनीच पाणी पाजलं,
स्वत:च्या मुलासारखं त्यांनीच मला जपलं...

मोठी झाले मी तरी इथेच कायम राहिले,
आजूबाजूला घडणारे सगळे बदल पाहिले...

म्हणतात बाहेरच्या जगात, 'आपल्या'सारखे असंख्य आहेत...
सार्या संकटांना तोंड देऊन अजूनही अजिंक्य आहेत!

ते सारे बाहेर राहून करत आहेत जे काम,
तेच इथे करायचय आपण न करता आराम...

"पण आई, आपल्याकडे कुणी पहातही नाही?!
म्हातारबुवा सोडला, तर कुणी पाणीही पाजत नाही..

मग का आपण या सगळ्यांना करत राहायची मदत?
जन्मभर अथक प्रयत्न करत राहायचं झिजत?!"

कारण बाळा, मदत करणं हा आपला धर्म आहे...
कर्म करत राहायचं हेच खरं मर्म आहे।

दोन गोष्टी मोलाच्या सांगते बाळा नीट ऐक,
हीच तत्वं पाळत आल्या आपल्या पिढ्या कैक!

बाहेर वा आत अस. पण दोन्ही हातानी देत जा.
खारीच्या वाट्याची जादू उघड्या डोळ्यांनी पाहत राहा!

हसत मुखाने अभिवादन नेहमी कर सगळ्यांना,
असं काम कर, कि तुझं नसणं जाणवेल त्यांना!

कुजबुज ही दोघांची नाही कुणी ऐकली,
कुंडीतल्या रोपट्याची फांदी तेवढी हल्ली...!

ऑफिस च्या entrance शी एक कुंडी आहे छान...
एक छोटीशी फांदी आणि तिचं कोवळं पान....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...