स्टेशनच्या शेजारीची भाजीवाली आजी, आवाज तिचा टिपेचा, ताजी तिची भाजी! लालबुंद टॉमेटो, हिरवीगार कोथिंबीर, मातकट सुरण, पण केशरी रंग देई धीर हसऱ्या चेहऱ्यानी ती सहज म्हणून जाते, "इतक्या पैश्यात ताई इतकीच भाजी येते… पिशवी मात्र मागू नका… तुमचीच पिशवी आणा… प्लास्टिक च्या एका पिशवी मागे वाचतो एक आणा… " बाजुवाल्या भैयाकडून ती सुटे पैसे घेते… पण ठणकावून सांगते.. "भाजी माझीच चांगली असते!" दुरून येताना पाहिलन की विचारते “आज काय देऊ? मटार , गावर, घेवडा, की थोडा फ्लॉवर ठेऊ?” दोन दिवस झाले ती दिसली नाही कुठे… का कुणास ठाऊक पण चुकल्या सारखं वाटे… निळ्या प्लास्टिक नि बांधलेली तिची टोपली तिथेच होती… पण त्यावर आता “Work -In -Progress” ची पाटी होती… महात्मा गांधी मार्गाचा पुन्हा जीर्णोद्धार होत होता… खोदलेल्या रस्त्यावर MSEB चा बोर्ड होता… कपाळाला आठ्या घालून मी काठ सावरत चालले, एक विचार येऊन मात्र एकदम गलबलले रोजची भाजी विकली नाही तर ती जेवत कशी असेल? गोजिरं तिचं हसणं आता परत कधी दिसेल?....