बाग

सरसावून बाह्या गं कामाला लाग
भरभरून फुलव आज आनंदाची बाग ||

आनंदाच्या बागेला हास्याची कमान
अनुभव आणि आधार बागकामाचं सामान,
पहिली रोपं लावायला तूच थोडी वाक
भरभरून फुलव आज आनंदाची बाग |

विश्वासाच्या रोपांना समजुतीचं सिंचन
विचारांची प्रगल्भता बागेसमोरचं अंगण
कधी हो सावली कधी दाखव उन्हाचा धाक
भरभरून फुलव आज आनंदाची बाग |

छोट्याश्या तुझ्या रोपट्याला मायेचं खळं कर
प्रेमाच्या ओलाव्याची घाल थोडी त्यात भर
कष्टांच्या फवारणिनी रोपाला तू राख
भरभरून फुलव आज आनंदाची बाग |
 
आपुलकीनी प्रत्येक रोप ताठ उभं राहू दे
दुःख आणि हेवेदावे निचरा होऊन जाऊ दे
प्रत्येक रोपातून मग येईल प्रेमाची हाक
भरभरून फुलव आज आनंदाची बाग |
 
मालकासारखं खत दे,
माळ्यासारखे कष्ट दे,
मुलांसारखं हसणं दे,
फुलपाखराचा स्पर्श दे

दिव्यासारखं डोळ्यात तेल घालून जाग
भरभरून फुलत राहील आनंदाची बाग |

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उपास मज लागला...

मैत्री -2